शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची त्रिसूत्री-प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे..

शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची त्रिसूत्री-प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे..

वसुंधरा महिला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न..



परभणी/प्रतिनिधी

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित स्व.कौशल्याबाई दुधगांवकर सेवाभावी संस्था, दुधगांव  संचलित वसुंधरा महिला महाविद्यालय, टाकळी (कुं.), ता.जि.परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रख्यात साहित्यिक तथा सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ राज्यघटना दिली नाही, तर 'शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन' ही त्रिसूत्री देऊन वंचित समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवणे, हीच खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीची सार्थकता ठरेल. आजही त्यांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक प्रा. प्रकाश वाकळे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेताना 'शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रमुख साधन' असल्याचे अधोरेखित केले. भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे आणि कविता सादर केल्या. कार्यक्रमास प्रा.ऋतुजा दुधगावकर, प्रा.एल.आर.पत्रे, एन.जी.महाजन, एस.बी.खानापुरे, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी एम.एस.उफाडे, व्ही.आर.घनसावंत यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post