अतिक्रमण हटवण्यामागचा उद्देश काय? – “काम केल्याचे दाखवणे की खरा विकास?”-गणेश वाळके..

अतिक्रमण हटवण्यामागचा उद्देश काय? – “काम केल्याचे दाखवणे की खरा विकास?”-गणेश वाळके..



परळी वैजनाथ प्रतिनिधी

परळी वैजनाथ येथे सध्या नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे सर्वाधिक फटका छोट्या व्यापाऱ्यांना बसत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चहा टपऱ्या, रसवंतीगृहे, पान स्टॉल, वडापाव गाड्या अशा लहान व्यवसायांवर कारवाई होत असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.

गणेश वाळके यांनी या कारवाईवर टीका करताना म्हटले की, “अतिक्रमण हटवण्यामागचा उद्देश नेमका काय? पदावर आहोत आणि काम करत आहोत हे दाखवण्यासाठीच ही मोहीम राबवली जात आहे का?” त्यांनी असा आरोपही केला की, काही ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींवर कारवाई होत नाही, तर सर्वसामान्य लहान व्यावसायिकांवरच बुलडोजर चालवला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, “जर जनतेने तक्रार केली तर ‘अर्ज द्या, कारवाई करू’ असे सांगितले जाते. मग या सध्याच्या कारवाईसाठी कोणाचा अर्ज होता?” सध्या बेरोजगारीची परिस्थिती गंभीर असताना, जे थोडेफार व्यवसाय सुरू आहेत तेही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

परळी शहरात ट्रॅफिकची समस्या प्रामुख्याने मोंढा मार्केट परिसरातच आहे. इतर भागात गर्दी कमी असताना देखील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे, त्यामुळे ही मोहीम केवळ दिखाऊ असल्याचा आरोप होत आहे.

गणेश वाळके यांनी प्रशासनाला आवाहन केले की, “खरा विकास करायचा असेल तर आधी ठोस विकास आराखडा जनतेसमोर मांडावा आणि त्यानंतरच कारवाई करावी. अन्यथा अशा पाडापाडीमुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढत जाईल.”

या कारवाईमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post