महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वाचनविषयक दृष्टिकोन आणि जीवनप्रवास..
विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एक कायदेतज्ज्ञ किंवा राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर ते अफाट ज्ञानाचे महामेरू होते. त्यांच्या अथांग ज्ञानाच्या मुळाशी होते त्यांचे 'वाचनवेड'. डॉ. बाबासाहेब 'वाचन' या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना अत्यंत मौलिक विचार मांडतात, जे त्यांच्या विद्वत्तेची व्याप्ती स्पष्ट करतात.
वाचनाची व्याप्ती आणि प्रक्रिया..
डॉ.बाबासाहेबांच्या मते, "वाचन म्हणजे केवळ डोळ्याखालून अक्षरे घालणे नव्हे, तर वाचन म्हणजे बोलणे आणि निर्जीव शब्दांना बोलते करणे होय." ते म्हणतात की, अक्षरे आणि शब्द मुक असतात; जो माणूस त्या मूक शब्दांना बोलते करतो, तोच खरा वाचक असतो. हे सामर्थ्य आणि ही पात्रता ज्याच्या अंगी असते, त्याच्याशीच अक्षरे, शब्द आणि ग्रंथ संवाद साधू लागतात. अशा वाचकाला शब्दांचे इंगित उमजते आणि ग्रंथांतून ग्रंथकाराचे नेमके विचार समजतात.
विचारांची मशाल आणि चिंतनाचे महत्त्व..
वाचनाची प्रक्रिया केवळ विचार समजण्यावर संपत नाही. डॉ.बाबासाहेब स्पष्ट करतात की, "एका मशालीने दुसरी मशाल पेटवली जाते, तसाच एक विचार दुसरा विचार जागृत करतो." वाचनाची परिमिती म्हणजेच अंतिम टप्पा हा चिंतनात व्हायला हवा. केवळ वाचलेला शब्द सार्थ आहे की नाही, आणि त्यातून व्यक्त होणारा विचार सत्य व साधार आहे का, हे त्यावर सखोल चिंतन केल्याशिवाय कळू शकत नाही.
बुद्धीची प्रगल्भता आणि वाचन..
डॉ. बाबासाहेब वाचनाची तुलना अन्नाशी करतात. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, "वाचन मनाला अन्न पुरवते; पण या अन्नाचे जसे चर्वण (चावून खाणे) केले तरच ते पचते, तसेच वाचनाचे आहे. वाचन पचले तरच बुद्धी प्रगल्भ होऊ शकते." बुद्धीच्या विकासासाठी आणि ज्ञानाच्या परिपक्वतेसाठी केवळ माहिती गोळा करणे पुरेसे नाही, तर ती माहिती आत्मसात करून त्यावर विचार करणे आवश्यक आहे.
अनुभवाचे बोल आणि ग्रंथप्रेम..
डॉ.बाबासाहेबांचे हे वाचनविषयक विचार पाहिले म्हणजे, ग्रंथवाचन, व्यासंग आणि चिंतन या गोष्टींना ते किती सर्वोच्च महत्त्व देत होते, हे प्रकर्षाने जाणवते. हा केवळ एक उपदेश नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवाचा निष्कर्ष होता. असे होते ग्रंथप्रेमी डॉ. आंबेडकर! "ग्रंथ हेच त्यांचे जीवनसर्वस्व होते आणि वाचन हे त्यांचे व्यसन होते. त्यांच्या कार्याचा आणि संघर्षाचा आधार हे त्यांचे प्रचंड वाचनच होते." अशा या महामानवाच्या विचारांच्या वाटेवर चालणारा मी एक छोटासा वाटसरू आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
![]() |
| डॉ.बळीराम पांडे अर्थशास्त्र विभाग, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर Mo.No.87886 69426 |





अतिशय प्रभावी मांडणी सर....
ReplyDeletePost a Comment