ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव २०२३ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव २०२३ पुरस्कार जाहीर..!


पुणे (सिनेसृष्टी)

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा जीवनगौरव २०२३ बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या सोमवारी, २६ जून रोजी आशाताईंना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे.

मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाननं चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना २०२३ या वर्षासाठी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा काळे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान तसेच रसिकांचे आदराचे स्थान आहे. दरवर्षी या वास्तूचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा खास ठरणार आहे. वर्धापनदिनानिमित्तानं २६ ते २८ जून याकाळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता नांदी आणि गणेशवंदनेनं महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. संध्याकाळी चार वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री आशा काळे यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. दरम्यान आशा काळे यांनी मराठी सिनेमे, नाटक आणि काही मालिकांमध्येही काम केलं होतं. आपल्या सोज्वळ रुपानं आणि दमदार अभिनयानं आशाताईंनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

मराठी सिनेमांबरोबर आशा काळे यांनी मराठी नाटकांतही काम केलं आहे. त्यांनी गहिरे रंग, एखादी तरी स्मितरेषा, गुंतता हृदय हे, एक रूप अनेक रंग, घर श्रीमंताचं, नल दमयंती, पाऊलखुणा, फक्त एकच कारण, बेईमान, देव दिनाघरी धावला, मुंबईची माणसं, लहानपण देगा देवा, वर्षाव, वाहतो ही दुर्वांची जुडी, महाराणी पद्यनी, वाऱ्यात मिसळले पाणी, विषवृक्षाची छाया, सीमेवरून परत जा, संगीत सौभद्र, वेगळं व्हायचंय मला, साटं लोटं या नाटकांत काम केलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post