धोकादायक बनलेल्या इमारतीमध्ये भरत असलेली जि.प.मुलांची शाळा तात्काळ हलवण्यात यावी..!
संभाजी ब्रिगेड, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी..!
परळी वैजनाथ प्रतिनिधी
शहरातील सरकारी दवाखान्याच्या बाजूस 83 वर्षापूर्वी बांधलेली निजामकालीन इमारत ज्यामध्ये जिल्हा परिषद मराठी व उर्दू इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शाळा भरते. ही इमारत अत्यंत धोकादायक बनलेली असून अशा इमारतीमध्ये शाळा भरवली जात आहे. होणारा धोका टाळण्ासाठी ही शाळा तात्काळ दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. वास्तविक पाहता जुन्या लाकूड व चुन्यामध्ये 83 वर्षांपूर्वी बांधलेली ही निजामकालीन इमारत पूर्णपणे धोकादायक झाली असून दरवर्षी छताचा चुना व लाकडे गळून पडत आहेत.
संबंधित इमारत कोणत्या क्षणी पडेल याची शाश्वती देता येत नाही. गोरगरीब कुटुंबातील तब्बल 500 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळेच्या वतीने गेल्या पाच वर्षात वारंवार प्रशासनाला लेखी व तोंडी कळवले पण आजतागायत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही किंवा काही उपाययोजना करण्यात बाबत पाऊल उचलले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असेल.? कारण सद्यस्थितीला जर शाळेची परिस्थिती बघितली तर पूर्णपणे छताला तडे गेलेले आहेत, छताचे जुने लाकूड पूर्णपणे निर्जीव होऊन गळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शाळेचा ढाच्या किंवा पूर्णपणे शाळा कधी जमीनदोस्त होईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून 500 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत व 17 शिक्षक शिकवण्याचे काम करत आहेत.
तात्काळ ही शाळा स्थलांतरित करण्यात यावी. अशा पद्धतीची लेखी व तोंडी विनंती संभाजी ब्रिगेड, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परळीचा विकास करण्यासाठी प्रस्थापित राजकीय नेत्यांची अनेक भाषण व बातम्या मध्ये करोडोचा निधी आणल्याचे आपण परळीकर नेहमी ऐकतो.पण ज्या ठिकाणी 500 विद्यार्थी पडायला झालेल्या इमारतीत शिक्षण घेत आहेत त्याकडे परळीचे लोकप्रतिनिधी बघतील का ? प्रशासन अघटीत घटना घडण्याची वाट बघत आहेत का काय ? असा सवाल याप्रसंगी उपस्थित करण्यात आला आहे.
ही शाळा तात्काळ स्थलांतरित करण्यात यावी अन्यथा तिन्ही पक्षांच्या वतीने संबंधित शाळेतील विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा याप्रसंगी तिन्ही पक्षांच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी मॅडम यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हासंघटक सेवकराम जाधव, तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, वंचित बहुजन आघाडीचे बीडजिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संजयभाऊ गवळी, युवा तालुकाध्यक्ष राजेशभैय्या सरोदे, एमआयएमचे शहराध्यक्ष शेख अन्वरभाई, कार्याध्यक्ष फिरोजभाई खान, सरचिटणीस शेख आतीक भाई, युवा नेते मोहसीन भाई, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गीते, युवा उपाध्यक्ष अवि मुंडे यांच्यासह संभाजी ब्रिगेड, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment