याची देही याची डोळा..!

याची देही याची डोळा..!


महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडा नंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे आणि अजूनही बंडाचा तिढा सुटलेला नाही. कारण शिवसेनेतील बंडखोर नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेलाच व्हेंटिलेटरवर आणले आहे. कारण शिवसेना नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर आपला हक्क असल्याचा दावा निवडणूक आयोग यांच्याकडे केला आहे. निवडणूक आयोग कायद्याप्रमाणे दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचे मिळून, प्रतिनिधी सभा, दोन तृतीयांश ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे शिवसेनेचा ताबा जाऊ शकतो. याबाबत नेमकी शिवसेना कोणाची हा विषय राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार शपथविधीनंतर पाहत आहेत आणि दुसरीकडे नुकताच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद येथे शिवसंवाद यात्रेला तुफान गर्दी, राज्यातील जनतेने "याची देही याची डोळा" अनुभवली आहे. तसेच नाशिक आणि अहमदनगर येथील आदित्य ठाकरे यांच्या सिवा संवाद यात्रेची तुफान गर्दी पाहून शिवसेनेवर दावा ठोकणाऱ्याना नक्कीच शिवसेनेचे पदाधिकारी आमदार, खासदार यांना एकत्र केले म्हणजे शिवसेना नाही हे नक्कीच लक्षात आले असेल. ही गर्दी निवडणूक सभा मधीलच गर्दी नव्हे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे की इतिहासामध्ये राजकीय बंड एवढे मोठे ठरले नाही अशा बंडाचा तिढा सुटत नाही आणि शिवसेना नेमकी कुणाची? हा प्रश्न राजकीय वर्तुळात सर्वांना संभ्रमात पाडणारा असून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला असेल का? हिंदुत्वावर ही ठिणगी पेटली असताना, भाजपबरोबर युती केली तरच हिंदुत्व आहे असा पायंडा राजकारणात नेमका पाडला असावा? देशामध्ये भाजप हिंदुत्ववादी आणि काँग्रेस पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून जनमाणसात रुजला आहे आणि ते तितकेच खरे आहे यात संदेह नाही. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची कधीही जुळवून घेण्याची भाषा केलेली नाही. परंतु त्यांच्याच मुलांनी हिंदुत्वाला सर्वसामावेशकतेची व्याख्या देऊन, देशाचा इतिहासात आणि एकूणच राज्याच्या इतिहासात ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री करून दाखविला हा सर्वसमावेशक हिंदुत्वाचा विजय नव्हता का? या प्रश्नांना जन्म उगीच घातला जात आहे. असो परंतु युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसंवाद यात्रेला मिळणारा शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहता शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न कोणाला पडेल असे वाटणार नाही कारण शिवसेनेने रस्त्यावरील माणसाला पदाधिकारी ते लोकप्रतिनिधी केले आहे हे राज्यातील इतर पक्षांसह सर्वांना ज्ञात आहे यात दुमत नाही त्यामुळे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य व विधानसभा किंवा देशपातळीवरील निवडणुकीत ठाकरे घराण्याशी शिवसैनिकांची बांधिलकी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने लक्षात येत असली तरी त्याचा खरा कस हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत लागणार आहे.

कोणत्याही पक्षातील फुटीर गट किंवा पक्षांतर केलेल्यांना जनता जागा दाखवून देते हे नव्याने सांगण्याची मुळीच गरज नाही. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय मानायचे, त्यांचे हिंदुत्व हेच हिंदुत्व आणि त्यांच्याच मुलाचं वेगळं हिंदुत्व हा विरोधाभास जनतेच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने एकत्र निवडणूक लढवली मात्र काही मतभेदानंतर त्यांची युती विस्कटली गेली आणि त्यानंतर महाराष्ट्रात नवीन प्रयोग म्हणून महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद बहाल केलं. याच वेळी हिंदुत्वावर काडीमोड झाली म्हणून आज हिंदुत्व आमचं हिंदुत्व खरं म्हणणाऱ्यांना कळलं नसेल का? कधीकाळी हिंदुत्वाला कवटाळून बसलेली शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसमावेशक शिवसेना केली. राज्यामध्ये शिवसेनेला सत्तेवर आणले, स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेत लोकसभेत पक्षाचे लोकप्रतिनिधी वाढले, ही जादू केवळ ठाकरे कुटुंबीयांच्या बांधीलकीमुळे आणि पक्षामुळे शक्य झाले आहे, हे कोणालाही विसरता येणार नाही.

पदमाकर उखळीकर
फिचर एडिटर, मराठवाडा साथी
Mo.No.9975188912

Post a Comment

Previous Post Next Post