शब्द जिवंत करणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे..!

शब्द जिवंत करणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे..!


माझी मैना गावावर राहिली...

ओतीव बांधा । रंग गव्हाळा । कोर चंद्राची । उदात्त गुणांची। मोठ्या मनाची । सीता ती माझी रामाची । हसून बोलायची । मंद चालायची । सुगंध केतकी । सतेज कांती । घडीव पुतळी सोन्याची । नव्या नवतीची । काडी दवण्याची। रेखीव भुवया । कमान जणू इंद्रधनुची । हिरकणी हिर्‍याची। काठी आंधळ्याची । तशी ती माझी गरीबाची । मैना रत्‍नाची खाण । माझा जीव की प्राण । नसे सुखाला वाण । तिच्या गुणांची छक्कड़ मी गायिली । माझ्या जिवाची होतीया काहिली ॥

हे छक्कड गीत आजही अनेकांना वेड लावणार आहे. कधीकाळी गरीब परिस्थितीमुळे गाव सोडावं लागणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संयुक्त महाराष्ट्र झाला परंतू, त्यापासून बेळगाव निपाणी हा भाग दुरावला गेला त्यामुळे अण्णाभाऊंनी लावणीच्या एका वेगळ्या प्रकारामध्ये छक्कड या प्रकारात 'माझी मैना गावाकडं राहिली , माझ्या जीवाची होतीया काहिली' हे गीत लिहून बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी लोकांचा भाग महाराष्ट्रापासून दूर राहिल्याचं दुःख छक्कड प्रकारात, तमाम मराठी मनाच दुःख अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून मांडल आहे. औपचारिकपणे कुठल्याही शाळेत न गेलेला हा तरुण रशियामध्ये झेप घेतो. एका दलित समाजातील तरुण आपल्या साहित्य कृतीतून विदेशात नावलौकिक मिळवतो हे थोडे-थोडेके नाही. अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी उघडतात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांना त्यांनी समर्पित केले आहे.

यावरून वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. त्यांच्यावर डॉ.आंबेडकर, कॉम्रेड डांगे, कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या साहित्यकृतीतून तमाम बहुजनांचं दुःख लिहिल्या गेलं आणि आज त्यांचं लिखाण चित्रपट आणि मालिकेच्या रूपात जेव्हा आजच्या पिढीला उपलब्ध होत आहे. त्यावरून अण्णाभाऊ साठे यांची साहित्य कृती संपदा आजच्या एकविसाव्या शतकातही तितकीच महत्त्वाची वाटते कारण, अजूनही दलित समाज उपेक्षितच आहे. समाजातील जातीय तेढ अजूनही आहे. हे वेगळं सांगण्याची मला वाटतं मुळीच गरज नाही कारण जातीय सलोखा राखण्यासाठी ज्या महापुरुषांनी आयुष्य वेचले आणि त्या महापुरुषांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी अण्णाभाऊ सारख्या शाहीरांनी मोठे योगदान दिले आहे. साहित्यातला कोणताही प्रकार अण्णाभाऊ साठे यांना अवगत होता. त्यांनी अनेक लोकनाटये, प्रवासवर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी, पोवाडे, पटकथा, लावणी, गीत, कविता, लेख, अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांचा हातखंडा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचे योगदान अनन्यसाधारण आहे. मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. तसेच, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्फूर्ती आणण्यासाठी अण्णाभाऊंनी आपल्या लिखाणातून मांडत राहिले. अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश मिळत गेलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश मिळाले असले, तरी बेळगाव, कारवार, निपाणी हा सीमेवरील भाग अजूनही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सामील नाही, ही सल अण्णाभाऊंनी आपल्या माझी मैना गावाकड राहिली या गीतातून बोलून दाखविली आहे. ज्याप्रमाणे दोन जीवांची ताटातूट व्हावी त्याप्रमाणे सीमा भागातील काही गावे , महाराष्ट्रात सामील न झाल्यामुळे ही ताटातून त्यांनी अतिशय जिवंत रूपक वापरून बेळगाव, निपाणी, कारवार हा भाग किती सुंदर आहे. हे त्यांनी अतिशय रूपकात्मक लिहिले आहे. केवळ अण्णाभाऊंचीच मैना नाही तर महाराष्ट्राचेच महिना गावाकड राहिली आहे. गायक, शाहिर विठ्ठल उमप यांच्या आवाजातील हे गीत आजही तितकेच प्रसिद्ध आहे.

अजूनही प्रत्येक जण गाण्याचे बोल एकू येताच गुणगुणू लागतो. कधीही शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊ साठे पुढे साहित्यिक होतात. त्यांनी अकलेची गोष्ट, अमृत, आघात, आबी (कथासंग्रह), आवडी (कादंबरी), इनामदार, कापऱ्या चोर (लोकनाट्य), कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह), खुळंवाडा (कथासंग्रह), गजाआड (कथासंग्रह) गुऱ्हाळ, गुलाम (कादंबरी), चंदन (कादंबरी), चिखलातील कमळ (कादंबरी), चित्रा (कादंबरी) चिरानगरची भुतं (कथासंग्रह), नवती (कथासंग्रह), निखारा (कथासंग्रह) जिवंत काडतूस (कथासंग्रह), तारा, देशभक्त घोटाळे (लोकनाट्य), पाझर (कादंबरी), पिसाळलेला माणूस (कथासंग्रह),पुढारी मिळाला (लोकनाट्य), पेंग्याचं लगीन (नाटक), फकिरा (कादंबरी), फरारी (कथासंग्रह), मथुरा (कादंबरी), माकडीचा माळ (कादंबरी), रत्ना (कादंबरी), रानगंगा (कादंबरी), रूपा (कादंबरी), बरबाद्या कंजारी (कथासंग्रह), बेकायदेशीर. (लोकनाट्य),माझी मुंबई (लोकनाट्य)मूक मिरवणूक (लोकनाट्य), रानबोका लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य) वारणेचा वाघ (कादंबरी),वैजयंता (कादंबरी), वैर (कादंबरी) शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य), संघर्ष, सुगंधा, सुलतान (नाटक) असे विपुल लेखन केले आहे. वरील प्रत्येक पुस्तकातून केलेलं विपुल लेखन समाजातील प्रत्येक व्यक्तीला समाजभान शिकवणार आहे. त्यांच्या या विपूल लेखनामुळे साहित्यसम्राट म्हणून ओळखले जाते. त्यांची आज जयंती त्यानिमित्ताने केलेला लेखप्रपंच.

पदमाकर उखळीकर
फिचर एडिटर, मराठवाडा साथी
Mo.No.9975188912

Post a Comment

Previous Post Next Post