भीषण अपघातात दोघे ठार; किल्ले धारुर तालुक्याचे दोघे गंभीर जखमी..!

भीषण अपघातात दोघे ठार; किल्ले धारुर तालुक्याचे दोघे गंभीर जखमी..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

भीषण अपघातात दोघे ठार झाल्याची घटना केज अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव बस थांब्याजवळ घडली. ट्रकच्या चाकातील हवा तपासत असलेल्या ट्रक चालक व क्लिनरला केज कडे भरधाव वेगाने येत असलेल्या कारने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात धारुर तालुक्यातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मंगळवार (दि.19 जुलै) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेला राजस्थान येथील ट्रक क्र. (RJ-11/GB-1086) हा चंदनसावरगाव येथील बस थांब्यालगत रस्त्याच्या कडेला थांबला होता. ट्रकचे चालक व क्लिनर हे खाली उतरून ट्रकच्या टायर मधील हवा तपासून पहात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अंबाजोगाईकडून भरधाव वेगाने केजकडे जाणाऱ्या कार क्र. (MH-44/0512) ने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक चालक व क्लिनरला चिरडले.

या भीषण अपघातात ताहेर हुसेन आणि इस्माईल हे दोघे ट्रक चालक व क्लिनर जागीच ठार झाले. त्यांना चिरडल्या नंतर कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जावून कार मधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे दोघे रा. गोपाळपूर ता. धारूर हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ 108 रुग्णवाहिकेतुन रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी आणले. या अपघातस्थळी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक औटी, पोलीस नाईक बालासाहेब घोरपडे, कदम आणि वाहन चालक शहेनशहा यांनी धाव घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post