गणेशोत्सवाच्या काळात जातीय सलोखा कायम ठेऊन उत्सव साजरा करा-कविता नेरकर..!

गणेशोत्सवाच्या काळात जातीय सलोखा कायम ठेऊन उत्सव साजरा करा-कविता नेरकर..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केज पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी पोलिस अप्पर अधीक्षक कविता नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली व जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून इनामदार, नगराध्यक्षा सीता बनसोड, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले सर, केज ठाण्याचे प्रमुख सपोनि. शंकर वाघमोडे, धारूर ठाण्याचे प्रमुख विजय आटोळे, नेकनूर ठाण्याचे प्रमुख मुस्तफा शेख, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

यावेळी बोलताना मूर्तीच्या विटंबनेचे प्रकार टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी मंडपात घुसणाऱ्या मोकाट जनावरांपासून गणेश मूर्तीची काळजी घ्यावी. देखावे सादर करण्यापूर्वी अगोदर पोलिस प्रशासनाची सहमती घ्यावी. देखावे, बॅनर हे सामाजिक संदेश देणारे असावेत. देखाव्यांतून कुठल्याही समाजाच्या, जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले.  पुढे बोलताना अप्पर पोलिस अधीक्षक नेरकर म्हणाल्या की, गणेशोत्सव काळात पावसाचे संकेत असल्याने मजबूत मंडप असावा. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन कर्तव्य पार पाडतचत असते. मात्र, गणेश मंडळांनी स्वयंसेवकांची नेमणूक करून मूर्तीची काळजी घेण्याची जबाबदारी राहील. दर्शनासाठी येणाऱ्या महिला, मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी मद्यपान करणाऱ्या व्यक्ती येणार नाहीत, अनावश्यक इतर गोष्टी घडणार नाहीत यासाठी पुढाकार घ्यावा. त्रासदायक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. मिरवणुकीत अपघात टाळण्यासाठी वाहनांची तपासणी व दोन चालकांची व्यवस्था करावी. मिरवणुकीत महिलांना सामील करून घ्यावे, त्यांना उत्सवाचा आनंद घेता येईल. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे वर्गणीसाठी बळजबरी करू नये. पोलिस ठाण्याकडून तीन गणेश मंडळांना बक्षिसे देण्याची घोषणा करत त्यांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन वेळेवर करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि. शंकर वाघमोडे यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंत भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post