वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची अखेर निवडणूक जाहीर, 11 जून रोजी होणार मतदान..!
परळी प्रतिनिधी
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. 21 जागांसाठी 11 जून रोजी मतदान होणार असून 12 जूनला मतमोजणी होणार आहे याबाबत अधिकृत निवडणूक परिपत्रक सहकार आयुक्तांनी जाहीर केले आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरिता 1998 मध्ये वैजनाथ सहकारी साखर कारखान्याची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उत्पादन क्षमता आणि
गुणवत्ता आशिया खंडात प्रथम क्रमांकाची होती. परंतु गेल्या काही वर्षात कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे. कारखान्यास पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे या वैद्यनाथ कारखान्याच्या चेअरमन आहेत.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी 10 मे ते 16 मे नामनिर्देशन पत्र दाखल करणे, 17 मे रोजी अर्जाची छाननी, 18 मे ते 1 जून पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. तर दोन जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 11 जून रोजी मतदान होणार आहे तर लागलीच दुसऱ्या दिवशी 12 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून परळी तालुक्यातील बीड जिल्ह्यात वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक केव्हा लागणार याविषयी राजकीय चर्चांना उधाण आले होते. सध्या व वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पंकजाताई मुंडे यांच्या ताब्यात आहे. परंतु वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात खेचून आणण्यासाठी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील अशी चर्चा होत आहे.




Post a Comment