राजस्थानी मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या रकमा पंधरा दिवसात परत कराव्यात नसता संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरणार..!

राजस्थानी मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या रकमा पंधरा दिवसात परत कराव्यात नसता संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरणार..!

"संचालक मंडळ तुपाशी, ठेवीदार मात्र उपाशी" असे चालणार नाही-सेवकराम जाधव..!


परळी वैजनाथ प्रतिनिधी

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेट क्रेडिट सोसायटी ली.परळी वै. गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी देण्यापासून दूर जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून ठेवी मिळत नसल्याकारणाने या मल्टीस्टेटचे खातेदार हवालदिल झालेले दिसून येत आहेत. एकाच वेळी सर्व ठेवीदार आले तर कुठलीही बँक पैसे देऊ शकत नाही. हे जरी सत्य असले तरी संचालक मंडळ दहा दहा, पंधरा पंधरा दिवस जर बँक बंद ठेवत असेल, ठेवीदारांसोबत कसलाही संभाषण समन्वय ठेवत नसेल, चोवीस तास बँकेचे शटर बंद असेल तर संचालक मंडळाचं असं वागणं संशयस्पद आहे.. असा प्रश्न ठेवीदारांना का पडू नये.?

 एकाच वेळी सर्व ठेवीदार बँकेतून पैसे काढत असतील तर कुठलीच बँक पैसे एकाच वेळी देऊ शकत नाही हे जरी सत्य असले तरी ज्यांच्या ठेवींच्या तारखा संपलेल्या आहेत त्यांच्या ठेवी बँकेने वेळेत परत केल्या पाहिजेत हे पण तितकंच सत्य आहे. रुपये ३०० कोटींच्यावर ठेवी ठेवणाऱ्यांना हताश करण्याचा संचालक मंडळाला काय अधिकार ? वेळेवर पैसे देणे ही जबाबदारी कोणाची ? ठेवीच्या संपलेल्या तारखेनंतर आपले हक्काचे पैसे परत मागणे हा ठेवीदारांचा गुन्हा आहे का.? यामध्ये ठेवीदारांची तिळमात्र चूक नाही. हा सरळ सरळ संचालक मंडळाच्या गलथान कारभाराचाच भाग आहे. ठेविंची मुद्दत संपूनही वेळेवर पैसे परत न मिळाल्याने गोरगरीब, छोटे - मोठे उद्योगी, व्यापारी, मजूर, शेतकरी अस्वथ झाले आहेत.

कोणाच्या घरी लग्नकार्य आहे, कोणाचे प्लॉट, शेतीचे कामे आहेत, कोणाच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा विषय तर काहींचे देण्याघेण्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याला जबाबदार कोण.? कोटींची उड्डाणे बंद करून राजस्थानी मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या रकमा पंधरा दिवसात परत कराव्यात नसता सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून गोरगरिबांचे पैसे परत मिळाल्या शिवाय स्वस्त बसणार नसून "संचालक मंडळ तुपाशी, ठेवीदार मात्र उपाशी" हे चालू देणार नाही असे मत संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. लवकरच सर्व ठेवीदारांची व्यापक बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post