वाढदिवसाला बोलावले नाही म्हणून एकाकी पडलेल्या २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या; कुंबेफळ गावात खळबळ..
अंबाजोगाई प्रतिनिधी
मित्रांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या तीव्र नैराश्यातून अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील २४ वर्षीय महेश उद्धव भणगे या तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी दुपारी राहत्या घराच्या छतावर त्याने विषारी द्रव्य प्राशन केले, रात्री ८ वाजेच्या सुमारास तो बेशुद्ध आढळल्यानंतर त्याला तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
महेशचे काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत वाद झाले होते, ज्यामुळे सोमवारी झालेल्या एका जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला त्याला निमंत्रित करण्यात आले नव्हते. नेहमी मित्रकार्यात पुढाकार घेणाऱ्या महेशला या उपेक्षेमुळे प्रचंड मानसिक वेदना झाल्या होत्या. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असे हृदयद्रावक स्टेटस ठेवून आपली व्यथा मांडली होती. वडिलांनी हट्टापायी शेती विकून त्याला कपड्याचे दुकान टाकून दिले होते, मात्र ऐन उमेदीच्या वयात त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.




Post a Comment