तीन महिन्यांपासून साखर गायब! परळीतील रेशन दुकानदारांना तहसिलदारांचा चाप..
सामाजिक कार्यकर्ते सुनील मस्के यांनी निवेदनाद्वारे केली होती तक्रार..
परळी-वै.प्रतिनिधी
शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागील तीन महिन्यांपासून साखर वाटपच झाले नसल्याची तक्रार समोर येताच तहसिलदारांनी थेट दुकानदारांना जाब विचारला आहे. त्यामुळे या निमित्ताने “साखर कुठे गेली?” हा सवाल आता ऐरणीवर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील मस्के यांनी रेशन दुकानात दुकानदाराच्या गलथानकार्पराबाबत परळी चे तहसीलदार यांना निवेदन देऊन तक्रार केली होती. याप्रकरणी तहसीलदारांनी सर्व रेशन दुकानदारांना पत्र काढून कारवाईचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साठेनगर येथील रहिवासी सुनील गिरजाप्पा मस्के यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अर्जातून गंभीर आरोप केले आहेत. परळी शहरातील अनेक रास्त भाव दुकानदार साखर वाटप करत नसून गेल्या तीन महिन्यांचा हिशोबच अस्पष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या तक्रारीची दखल घेत तहसिलदारांनी तत्काळ कारवाईचा इशारा दिला आहे. शासनाच्या नियमानुसार सध्या फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर वितरित केली जाते. मात्र, प्रत्यक्षात किती साखर दुकानांना मिळाली? किती लाभार्थ्यांना दिली? आणि किती शिल्लक आहे? याचा लेखाजोखा अस्पष्ट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे. तहसिलदारांनी सर्व रास्त भाव दुकानदारांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, आपल्या दुकानाला मिळालेल्या साखरेचा तपशील, वाटप यादीसह, १३ एप्रिल २०२६ पर्यंत लेखी अहवाल सादर करावा. अन्यथा संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात किती कडक भूमिका घेते आणि दोषींवर नेमकी काय कारवाई होते. याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment