सतीशभाऊ चव्हाण : सर्वसामान्य वंचितांचे ऊर्जास्रोत..
संघर्षातून घडलेले नेतृत्व, समाजकारणाची अखंड साधना आणि वंचितांच्या आशाआकांक्षांचा विश्वासू चेहरा अशी सर्वसामान्य लोकांना ओळख असणारे व्यक्तिमत्त्व अर्थातच सतीशभाऊ चव्हाण. लोकशाही व्यवस्थेत नेतृत्वाची उंची केवळ राजकीय पदांमुळे ठरत नाही; ती ठरते समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात घडवून आणलेल्या सकारात्मक परिवर्तनामुळे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटात धीर देणारे, शासन आणि समाज यांच्यातील दुवा बनणारे, संघर्षाला विकासाच्या संधीमध्ये रुपांतरित करणारे नेतृत्वच काळाच्या कसोटीवर टिकते. अशा नेतृत्वाचा विचार करताना आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व विशेषत्वाने समोर येते. सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारे, वंचितांच्या वेदनांना आपलेपणाने कवटाळणारे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची किरणे पोहोचविण्यासाठी अखंड धडपडणारे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे.
संघर्ष यात्री..
सामान्य माणसाच्या वाट्याला जे संघर्ष येतात, तेच संघर्ष भाऊंच्याही वाट्याला आले. घरची परिस्थिती बेताचीच. त्यात वडिलांचे अकाली निधन म्हणजे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर. वयाच्या कोवळ्या टप्प्यावरच कुटुंबप्रमुखाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांची भक्कम शिदोरी, जिवाभावाच्या मित्रांचे सहकार्य आणि संकटांशी दोन हात करण्याची जिद्द यामुळे त्यांनी या जबाबदारीचे ओझे न मानता ते आपले कर्तव्य म्हणून स्वीकारले.
महाराष्ट्र राज्याचे पहिले कर्तृत्ववान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचार आणि कार्याची प्रेरणा घेऊन सतीशभाऊ चव्हाण यांनी पुरोगामी चळवळीत स्वतःला झोकून दिले. सामाजिक कार्याच्या प्रवासातच मराठवाड्यातील शिक्षक मतदारसंघाचे आमदार कै. वसंतराव काळे साहेबांशी परिचय झाला. काही काळातच साहेबांचे विश्वासू शिष्य म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. विद्यार्थिदशेपासूनच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सखोल प्रभाव होता. पुढे मा. अजितदादा पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणूनही त्यांची ओळख दृढ झाली.
ही ओळख केवळ राजकीय संबंधांमधून निर्माण झालेली नाही. अभ्यास, कर्तृत्व, प्रतिभा, सचोटी आणि माणसांशी जुळलेले जिव्हाळ्याचे नाते या भक्कम पायावर ती उभी आहे. मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील जवळपास १० हजारांहून अधिक तळागाळातील व्यक्तींशी त्यांनी निर्माण केलेला जिव्हाळा हा त्यांच्या कार्याचा खरा ठेवा आहे. गरीब असो वा श्रीमंत, शेतकरी असो वा कामगार, विद्यार्थी असो वा कर्मचारी—प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची हातोटी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे. आईचे आशीर्वाद, वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, कुटुंबाची साथ आणि जिवाभावाच्या मित्र-सहकाऱ्यांचे पाठबळ या साऱ्यांचा सुंदर संगम म्हणजे सतीशभाऊंची आजची ठाशीव ओळख.
अथक प्रवासाची कहाणी..
भाऊंचा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास केवळ राजकीय पदांचा नाही; हा माणसांच्या सुख-दुःखाशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रवास आहे. सकाळी किती वाजता उठावे, किती मैल चालावे, दिवसागणिक किती बैठका घ्याव्यात, किती कार्यकर्त्यांना भेटावे आणि किती समस्या ऐकून घ्याव्यात याला जणू काही मर्यादाच नाही.
कार्यकर्त्यांचे सांगाती..
कार्यकर्त्यांची बैठक घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातील सुखदुःखाच्या प्रसंगी त्याच्या घरी जाऊन मायेने खांद्यावर हात ठेवणे, त्याला धीर देणे आणि नव्या उमेदीने उभे करणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन कार्यशैलीचा भाग आहेत.
कोविड-१९ सारख्या अभूतपूर्व संकटाने जग ठप्प झाले, तरी जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांची धडपड थांबली नाही. समाजाशी असलेली त्यांची ही नाळच त्यांच्या कार्याची खरी ऊर्जा आहे. म्हणूनच त्यांच्या कामाकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहणे म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याप्ती कमी करून पाहणे ठरेल.
समाजसेवेचे व्रत : सेवेतून साकारलेली माणुसकी..
भाऊंनी समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवले. मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात निःपक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे काम करत त्यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवला.
त्यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडणे सहज शक्य नाही. कारण त्यांनी केलेल्या कामाची व्याप्ती मोठी आहे आणि त्यामागची माणुसकी त्याहून मोठी आहे. तरीही त्यांच्या कार्यातील काही ठळक पैलू अधोरेखित करणे आवश्यक ठरते.
भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान’ : निराधारांचे आधार केंद्र..
सामाजिक भान हा केवळ शिकवून मिळणारा गुण नाही; तो रक्तात असावा लागतो. भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात हे सामाजिक भान पावलोपावली जाणवते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अपंग आणि निराधार व्यक्तींनाही सन्मानाने आरोग्यसेवा मिळावी, या भावनेतून ‘भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया, तसेच दिव्यांगांसाठी 'जयपूर फूट शिबिरां'चे आयोजन करून आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार विविध आजारांवरील उपचारांसाठी ८३६ रुग्णांवर सुमारे २०८३ लाख रुपये, अपंग रुग्णांसाठी १२६७ लाभार्थ्यांवर सुमारे १८३ लाख रुपये आणि हाडांच्या आजारांसाठी ६७० रुग्णांवर सुमारे ४.२० लाख रुपये खर्च करण्यात आले. अशा प्रकारे एकूण २७७३ रुग्णांना सुमारे २२७०.२० लाख रुपयांची मदत मिळाली. प्रतिष्ठानबरोबरच विविध सेवाभावी संस्था आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनही या सेवाकार्याला हातभार लावण्यात आला.
माणसाच्या दुःखाला जात, धर्म, पक्ष किंवा आर्थिक परिस्थितीची चौकट नसते. म्हणूनच भाऊंच्या सेवाकार्यातही या चौकटींना स्थान नाही.
आई मनाचा बाप माणूस..
अनाथांची होरपळ पाहून त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता आले पाहिजे यासाठी सतीशभाऊंनी अनेकांना मायेचा आधार देत खऱ्या अर्थाने उभे केले आहे.
संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी..
कोविड-१९च्या महाभयंकर संकटात संपूर्ण देश आणि राज्य भयभीत झाले होते. अशा वेळी आरोग्य व्यवस्थेतील प्रश्न भाऊंनी विधिमंडळात सातत्याने आणि आग्रहीपणे मांडले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले विद्यावेतन मिळावे, यासाठी त्यांनी आवाज उठवला. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या मानधनात अनुक्रमे २ हजार आणि ३ हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. कोरोना चाचणी केंद्रावर खाटा उपलब्ध असतानाही एका रुग्णाला झाडाखाली ऑक्सिजन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. संकटाच्या काळात सामान्य माणसाच्या प्रत्येक अडचणीवर त्यांची नजर होती, याचे हे एक ठळक उदाहरण.
कोरोना विषाणूविषयक संशोधन व निदानासाठी मराठवाड्यात नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयातील नवजात शिशूंसाठी वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी १० लाख रुपये, लातूर येथील कै. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० लाख रुपये आणि १५ जून २०२० रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी २० लाख रुपयांचा निधी देऊन त्यांनी आरोग्यव्यवस्थेला हातभार लावला.
दातृत्व हे केवळ धन देण्यात नसते; संकटात माणसाच्या पाठीशी उभे राहण्यात असते. भाऊंच्या कार्यातून याची प्रचिती वारंवार येते.
शेतकऱ्याच्या वेदनेशी नाते..
भाऊंच्या मनात शेती आणि शेतकऱ्यांविषयीची आस्था खोलवर रुजलेली आहे. शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक परतीच्या पावसाने वाहून जाते, तेव्हा केवळ पीक नष्ट होत नाही; त्याच्यासोबत एका कुटुंबाची आशा, कर्ज फेडण्याचे स्वप्न आणि उद्याची चिंता वाहून जाते.
मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला असताना सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाऊंनी विधिमंडळात ठामपणे मांडली. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता सरसकट हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले.
आज महाराष्ट्र पाण्याअभावी भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली, शेतकरी भयभीत झाला, शेतकऱ्याला या कोरड्या भीषण दुष्काळात आधार मिळावा म्हणून शासनाने बहुतांश तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे यासाठी निवेदन दिले, त्याचा परिपाक म्हणून मायबाप सरकारने बहुतांश तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले उर्वरित सुद्धा जाहीर केल्यात जमा आहेत. एवढेच नाही तर गोरगरीब वा शेतकऱ्याच्या मुलांची संपूर्ण फीस माफ व्हावी यासाठीसुद्धा प्रयत्न केले.त्याचा परिणाम म्हणून शासनाने सकारात्मक पाहूल उचलले.असा 'अनाथाचा नाथ ' म्हणून भाऊ वेगवेगळ्या भूमिकेत असतात.
कोविडच्या संकटातही शेतकऱ्याला आधार मिळावा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजरीचे बियाणे मोफत वितरित करण्यात आले. मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध माध्यमांतून मदत करण्यात आली.
शिक्षणाच्या वाटेवरील दीपस्तंभ..
शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे, याची जाणीव भाऊंना आहे. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
NEET परीक्षा केंद्रे, ७०:३० सूत्र रद्द करणे, केंद्रीय विधी विद्यापीठासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी प्रयत्न, विद्यार्थ्यांना वयोमर्यादा सवलत, ‘वेध भविष्याचा’, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ यांसारखे उपक्रम हे त्यांच्या शिक्षणाभिमुख दृष्टीचे प्रभावी उदाहरण आहेत. ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे हा त्यांच्या कार्याचा गाभा राहिला आहे.
गावा-गावाच्या प्रश्नांशी जुळलेली नाळ..
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील गावांच्या अडी-अडचणी भाऊंच्या लक्षात राहतात. रस्ता, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा मूलभूत प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि त्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती ठरली आहे.
माणसांना जोडणारा ‘कॉमन सेन्स’..
गोरगरीब, कष्टकरी, कलावंत, बेरोजगार युवक-युवती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध घटकांच्या प्रश्नांशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले आहे. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा प्रभावी सामाजिक ‘कॉमन सेन्स’. मोठ्या घोषणा करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य प्रश्न उपस्थित करणे आणि शक्य तिथे प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणे हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.
नेतृत्वाची खरी उंची..
सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्रवासाकडे पाहताना जाणवते की, हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही; तो संघर्षातून उभ्या राहिलेल्या समाजविश्वासाचा प्रवास आहे. शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, कामगार, बेरोजगार, कलावंत आणि वंचितांच्या प्रश्नांना स्वतःचे प्रश्न मानणाऱ्या संवेदनशील नेतृत्वाचा हा प्रवास आहे.
त्यांच्या कार्याची व्याप्ती आकडेवारीत मांडता येईल; विविध उदाहरणांतून स्पष्ट करता येईल; परंतु त्या कार्यामागील माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचे मोजमाप कोणत्याही आकड्यांत होऊ शकत नाही.
कारण काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत; त्या लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळे मोठ्या होतात.
सर्वसामान्यांच्या दुःखाला स्वतःचे दुःख मानून, त्यांच्या स्वप्नांना स्वतःची जबाबदारी समजून आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे सतीशभाऊ चव्हाण हे अनेकांसाठी आशेचा किरण, संघर्षाची प्रेरणा आणि सर्वसामान्य वंचितांचे ऊर्जास्रोत म्हणून उभे राहतात. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी पदवीधर मतदार निश्चितच देतील, असा विश्वास आहे.
डॉ.बळीराम पांडे
देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
Post a Comment