राज्य सरकारला मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात आणून विद्यार्थ्यांत जातीवाद आणि विषमता पेरायचीय का-रानबा गायकवाड..
परळी-वै. प्रतिनिधी
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घालून राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच जातिवाद आणि विषमता पेरायचीय का असा संतप्त सवाल जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केला आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक नाही तर संविधानाचे धडे द्यावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात रानबा गायकवाड यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम मंडळाच्या वतीने आगामी शैक्षणिक वर्षासाठी येणाऱ्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याविषयी तो 3 जूनपर्यंत नागरिकांना हरकतीसाठी ठेवण्यात आला आहे. उच्चनीचता, जातीभेद आणि विषमता तसेच अस्पृश्यता निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाची महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे होळी केली होती. व हा ग्रंथ मानवतेसाठी कलंक असल्याचे म्हटले होते.
मनुस्मृती हा ग्रंथच मुळात काही विशिष्ट जातीचे हितसंबंध आणि मक्तेदारी कायम करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात अस्पृश्यांनाच नव्हे तर महिलांना सुध्दा अपमानास्पद असे कायदे सांगितले आहेत. तुच्छ लेखले आहे. मनुस्मृतीत वर्णव्यवस्था निर्माण केली आहे. ही वर्णव्यवस्था व जातीभेद तसेच उच्चनिच्चता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून उखडून टाकली आहे.
अशा विषमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृति ग्रंथातील एकाही श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येऊ नये. हा तमाम फुले, शाहू, आंबेडकरी महाराष्ट्राचा अपमान असल्याचेही रानबा गायकवाड यांनी म्हटले आहे.




Post a Comment