संगीत विशारद परीक्षेत देशात व महाराष्ट्र केंद्रात अव्वल; शर्वरी डोंगरे यांना दहा प्रतिष्ठित पुरस्कारांचा मान..
लातूर | प्रतिनिधी
लातूरच्या कु.शर्वरी विवेक डोंगरे यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या एप्रिल–मे २०२५ सत्रातील संगीत विशारद परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. देशपातळीवर सर्वाधिक गुण मिळविण्यासोबतच गायन विषयातही सर्वाधिक गुण मिळवत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र केंद्रातही सर्वाधिक गुण मिळवत आणखी एक मानाचा बहुमान आपल्या नावावर केला आहे.
या उल्लेखनीय यशाची दखल घेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने शर्वरी डोंगरे यांचा २२ ऑगस्ट २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या दीक्षांत समारंभात विशेष सत्कार आयोजित केला आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यात त्यांना एकूण दहा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
देशात प्रथम क्रमांक आणि गायन विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना प्रीतम कोरे सोनी पुरस्कार, कै.पं.दि.वि.पलुस्कर पुरस्कार, सौ.नलिनी प्रताप कानविंदे पुरस्कार, प्रा. वासुदेव चिंतामणी वाघमारे पुरस्कार, हरी ओम ट्रस्ट (गायन) प्रथम पुरस्कार, श्री. हरिश्चंद्र बाळकृष्ण पोतदार पुरस्कार, पं.ना.कु.काणे स्मृती पुरस्कार आणि कै. सौ. प्राजक्ता पुरुषोत्तम कुलकर्णी पुरस्कार अशा आठ प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र केंद्रात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना पं. शंकर ससे पुरस्कार आणि कै.सौ.शैलजा जावडेकर पुरस्कार असे आणखी दोन मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकाच दीक्षांत समारंभात शर्वरी डोंगरे यांना एकूण दहा पुरस्कारांनी गौरविण्यात येणार असल्याने हा लातूरसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने अधिकृत पत्राद्वारे शर्वरी डोंगरे यांना समारंभास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण दिले असून, त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संगीत क्षेत्रातील मान्यवर, गुरुजन, पालक, नातेवाईक आणि लातूर जिल्ह्यातील विविध स्तरांतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शर्वरी यांच्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण रियाज आणि जिद्दीमुळे मिळालेले हे यश अनेक उदयोन्मुख संगीत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तसेच शर्वरी डोंगरे यांना वर्ष 2021--2022 या वर्षा साठी केंद्र शासनाची प्रतिष्टीत सीसीआरटी (CCRT ) शिष्यवृत्ती मिळालेली आहे, तिच्या या उत्कृष्ट कामगिरी मुळे ही शिष्यवृत्ती पुढील आणखी दोन वर्षा साठी वाढवून आली आहे तिच्या या यशात तिचे गुरु डॉ.वृषाली देशमुख व गुरु श्री शशिकांत जी देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.
शर्वरी डोंगरे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संगीत क्षेत्रातील मान्यवर, गुरुजन, कलावंत, विद्यार्थी आणि रसिकांकडून त्यांच्या मेहनती, सातत्यपूर्ण रियाज व उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले जात असून, त्यांच्या या यशामुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Post a Comment