कामगार कल्याण केंद्र,परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या ‘श्रमानेच उद्धार’ला द्वितीय क्रमांक..

कामगार कल्याण केंद्र,परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या ‘श्रमानेच उद्धार’ला द्वितीय क्रमांक..

अश्वमेध नाट्य संघाचे गटस्तरीय समरगीत स्पर्धेत उल्लेखनीय यश..



परळी वैजनाथ प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित कामगार कल्याण केंद्र गटस्तरीय समरगीत स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, परळी औष्णिक विद्युत केंद्र यांच्या सौजन्याने औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अश्वमेध नाट्य संघाने सादर केलेल्या ‘समरगीत : श्रमानेच उद्धार’ या समूहगीताने द्वितीय क्रमांक पटकावला. ड्युटीच्या वेळा व कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळून कलाकारांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे हे यश मानले जात आहे.

नोकरीच्या व्यापातून वेळ काढत कलाकारांनी या स्पर्धेची तयारी केली. ड्युटीपूर्वी अथवा ड्युटीनंतर उपलब्ध होणाऱ्या वेळेत तालमी घेण्यात आल्या. अनेकदा दिवसभराच्या कामानंतरचा थकवा बाजूला ठेवून कलाकारांनी सरावाला उपस्थिती लावली. कामाची जबाबदारी आणि कलेची साधना यांचा समतोल साधत केलेल्या या प्रयत्नांना अखेर पुरस्काराची पावती मिळाली.

या सादरीकरणाचे गीत दिग्दर्शन श्री. सिद्धेश्वर इंगोले यांनी केले. समूहातील प्रत्येक कलाकाराच्या आवाजातील वैशिष्ट्यांचा योग्य वापर करत स्वर, ताल, लय आणि समूहगायनाचा प्रभावी मेळ साधण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ‘श्रमानेच उद्धार’ या गीताचे प्रभावी आणि एकसंध सादरीकरण घडले. या यशाचे शिल्पकार म्हणून श्री. सिद्धेश्वर इंगोले यांचे विशेष कौतुक होत आहे.

या समूहगीतामध्ये श्री. सिद्धेश्वर इंगोले, सोनाली डोंगरे, जयश्री फाटक, ज्योती फड, अभय होनमाने, अनिल चव्हाण, संदीप पाटील, अनिता पाटील, विरनाथ डोंगरे, बाळकृष्ण कुकडे, प्राची कुकडे, प्रांजल कुकडे आणि महेश होनमाने यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमासाठी निर्मिती प्रमुख मा. श्री. सुनीलजी इंगळे (मुख्य अभियंता, परळी औष्णिक विद्युत केंद्र), केंद्र संचालक श्री. विजय वायाळ, संघ प्रमुख महेश ज्ञानोबा होनमाने आणि मार्गदर्शक श्री. प्रसाद धस (कामगार कल्याण अधिकारी, लातूर) यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच श्रीमती उज्ज्वला बडवे, सौ. वंदना लोखंडे, सौ. रोहिणी होनमाने, दिनेश कदम, शेख अकबर बागबान, शिरीष तीर्थकर, विद्याधर शिरसाठ, वसिष्ठ कुकडे, तुकाराम गित्ते, मिलिंद यादवराव चन्ने, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी (प्र.) श्री. शरद राठोड, कल्याण विभागात कार्यरत श्री. राजू गजले व सौ.किष्किंधा गित्ते तसेच मानव संसाधन विभागातील प्रतिक डोईजड यांचे विशेष सहकार्य लाभले.

या यशाबद्दल कामगार कल्याण केंद्र, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, अभियंते, विभागप्रमुख आणि कर्मचारीवृंदाचे संघाच्या वतीने आभार मानण्यात आले. कलाकारांना प्रोत्साहन, आवश्यक सहकार्य आणि विश्वास दिल्यामुळे या यशस्वी वाटचालीला बळ मिळाले, अशी भावना संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

ड्युटीच्या जबाबदाऱ्या सांभाळून कलेसाठी वेळ देत, एकजुटीने आणि समर्पणाने केलेल्या प्रयत्नांतून मिळालेला हा द्वितीय क्रमांक अश्वमेध नाट्य संघाच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण यश ठरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post